मंगळवार, २८ जून, २०२२

अग्निपथ योजना आणि तरूणांचा विरोध

 

तरुणांना लष्करात सेवेची संधी देण्याचा दृष्टीने सरकारने अग्निपथ योजना आणलेली आहे.


             सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आणि लगोलच त्याला विरोध सुरू झाला. अग्निपथ योजनेला होणार विरोध आणि त्याबद्दल तरुणांचे काय म्हणणे आहे हें पाहण्याआधी अग्निपथ योजना नक्की काय आहे हे आधी पाहू या...


अग्निपथ योजना नक्की काय आहे ???? 

● 4 वर्ष सैन्यात नोकरी करण्याची संधी

● वय 17 ते 22 वर्ष . यावेळी त्याची मर्यादा 23 वर्ष असेल कारण कोरोना मुळे 2 वर्ष सैनिकांची भरती झालेली नाही.

● पगार

पहिल्या वर्षी :- 30,000 

दुसऱ्या वर्षी :- 33,000

तिसऱ्या वर्षी :- 36,000

चौथ्या वर्षी :- 40,000

● 10 वी / 12 पास 

● पगारातून काही रक्कम कपात केली जाईल व त्यात सरकार काही रक्कम ऍड करेल म्हणजे शेवटच्या वर्षी 11 ते 12 लाख रुपये मिळतील..

● फक्त सैनिक म्हणून भरती केली जाणार अधिकारी नाही.

● जे सैन्यात भरती होतील त्यांना ' अग्निवीर ' म्हंटल जाणार आहे.

● 4 वर्षानंतर त्यातील 25 % अग्निवीर यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार...

● राहिलेल्या 75 % अग्निवीरांना एक सर्टिफिकेट दिल जाईल त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मध्ये फायदा होईल.

● अग्निवीरांचा 48 लाखांचा विमा उतरवला जाईल.

● जर अग्निवीर शहीद झाला तर त्याला लाभ दिले जातील.


फायदे :-  

◆ तरुणांना सैन्यात नोकरीची संधी ..

◆ शिस्तप्रिय समाज निर्माण होईल...

◆ काही प्रमाणात पैसा मिळेल....

◆ समाजात जबाबदार नागरिक तयार होतील...


सुरुवात कधी :- 

90 दिवसानंतर या योजनेला सुरुवात होणार आहे आणि या अग्निवीरांचा कालावधी संपला की पुन्हा 90 दिवसात दुसरी भर्ती होणार आहे.

 अग्निपथ योजनेला विरोध का आहे ?? 

◆ कायम नोकरी नाही...

◆ पेन्शन नाही..

◆ आधीच्या सैनिकांन प्रमाणे मेडिकलचे लाभ नाहीत...

◆ आता अग्निवीर भरतीच होणार आधीची भरती होणार नाही...

◆ चार वर्षे सेवा केल्यानंतर काय हा मोठा प्रश्न उभा राहील...

◆ गावाकडे मुलगा आर्मीत भरती झाला की त्याचे लग्न जमायचे पण आता तसं होणार नाही कारण नोकरी फक्त 4 वर्षच असेल त्यापुढे नाही...

◆ अग्निवीराची 25 % मध्ये निवड झाली नाही तर काय??

◆ देशात जे 20 ते 25 लाख तरुण आर्मी मध्ये जाण्यासाठी 2 ते 3 वर्ष तयारी करत आहेत ते काय 4 वर्षाच्या अग्निपथ योजनेसाठी का ???

◆ प्रशिक्षित तरुण जर उद्या बाहेर पडले आणि ते जर घटक शक्तींच्या संगतीत आले तर देशाचे अधिक नुकसान होऊ शकत...


           कोणत्याही देशातील सरकार हे आपली आर्मी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असते. जास्त सैनिक म्हणजे प्रबळ आर्मी अस नसतं तर ज्या देशाकडे आधुनिक हत्यारे आहेत ती आर्मी बलवान असते. म्हणून प्रत्येक देश मनुष्यबळ कामींकरून त्या वर होणारा खर्च या अत्याधुनिक साधनांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. 


             खूप वर्षानंतर भारत सरकारने आर्मी मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय चांगला आहे पण त्यातील काही त्रुटी दूर करून ही योजना राबवली तर उत्तम होईल.


           नवीन कोणतीही योजना आकार घेत असताना त्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात पण त्यातील चुका दुरुस्त करून आपण ती योजना राबवू शकतो तिला सरसकट विरोधाला विरोध करण हे बरोबर नाही..



सोमवार, १३ जून, २०२२

Honesty is a valuable quality/प्रामाणिकपणा एक बहुमूल्य गुण...

               काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचनात आली.  फलटण स्टँड वर एका व्यक्ती चे 10,000 रुपये हरवले. त्याला ते घरी गेल्यावर समजले की आपले पैसे कुठे तरी पडले. ते शोधण्यासाठी तो पुन्हा स्टँड वर आला. या गडबडीत रात्रीचे 10.30 वाजले. तो जेव्हा स्टँड वर आला आणि चौकशी करू लागला तेव्हा एका साध्या कपड्यात असणारा गावाकडच्या माणसाने त्याला ते परत केलं. ज्या माणसाला हे पैसे सापडले त्याची चौकशी केल्यावर कळले की हा माणूस 6 वाजता स्टँड वर घरी जाण्यासाठी आला होता. पण गावाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाला 10 रुपये कमी होते. त्यामुळे तो तसाच स्टँड वर थांबला होता. त्याला ही 10,000 हजार रुपयांची रक्कम 8 वाजताच सापडली होती. 


              आता विचार करा ज्या माणसाला घरी जाण्यासाठी 10 रुपये कमी होते आता त्याच्याकडे 10,000 रुपये होते त्याने काय करायला पाहिजे होत. तो स्पेशल गाडी करून घरी जाऊ शकत होता. पण तो ते पैसे घेऊन कुठेही गेला नाही. तो तिथेच स्टँड वर थांबला होता. ज्याकोणाचे हे पैसे असतील त्याला ते परत करण्यासाठी आणि तिकीटाला 10 रुपये कमी आहेत म्हणून पण त्याने त्या सापडलेल्या पैशातील एकही रुपया त्याने खर्च केला नव्हता. 


                 हरवलेले पैसे मिळाल्यानंतर ती व्यक्ती 1000 रुपये ह्या माणसाला देत होती. पण याने ते घेतले नाहीत. तर त्या माणसाने त्या व्यक्ती कडून तिकीटाला कमी पडणारे फक्त 10 रुपयेच घेतले. इतका प्रामाणिकपणा पाहिला की कधी कधी स्वतःच्या आतमध्ये डोकावून पहावसं वाटत की आपण प्रामाणिकतेच्या मीटर मध्ये कुठे आहोत.


                हे आपले पैसे नाहीत मग ते घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. ज्याचे ते आहेत त्याच्याकडे पाहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. दुसर्याच्या वस्तूला आपलं म्हणणं चूक आहे. किती सरळ आणि साधं तत्वज्ञान आहे या माणसाचं. आत्ताच्या या स्वार्थी जगात अशा प्रामाणिक माणसांचा खूप आदर वाटल्याशिवाय राहत नाही. या माणसांचं अगदी साध सरळ तत्वज्ञान असत. माणसाची खरी पारख जर काररायची असेल तर ती त्याच्या कपड्यांवरून न बकरता त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांवरून करायला हवी. 


              याउलट जेव्हा मी शिकलेली , भरपूर डिग्री घेतलेली माणसं जेव्हा लाच घेतात तेव्हा चीड येते. आणि अशी अशिक्षित माणसं किती साधी , सरळ विशेषतः प्रामाणिकपणे वागतात तेव्हा प्रश्न पडतो की खरंच शिक्षणाने माणूस घडतो का ? माणूस उच्च शिक्षित झाला म्हणजे सगळे गुण त्याच्या अंगी आले अस होत का ? का नक्की कशात प्रॉब्लेम आहे उच्च शिक्षण घेतलेल्या माणसात का ? आपण देत असलेल्या शिक्षण पद्धतीत ? 


             मूल्य न शिकता जर नुसतं डिग्री घेऊन आपण शिक्षित होणार असू तर सगळी यांत्रिक पिढी निर्माण होईल. जी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करेल. यासाठी तर शाळांमध्ये सध्या मूल्यशिक्षण सुद्धा तास असतो. आपल्या वेळी अस काही होत का ? तर नाही खर बोलणे , इतरांना मदत करणे , प्रामाणिकपणे काम करणे हे सगळं घरीच गोष्टी मधून शिकवलं जायचं. 


             प्रामाणिकपणा हा किती महत्वाचा गुण आहे. तो ज्याच्या जवळ आहे तो खरा सुशिक्षित आहे. कोणत्याही फालतू माणसाकडे तो असेल अशी अपेक्षा करण चुकीचं आहे. बहुमुल्य वस्तू ची किंमत अशा माणसांना कळत नाही आपण त्यांच्या कडून त्याची अपेक्षा ठेवू नये... 

शुक्रवार, ३ जून, २०२२

Wildlife and human conflict: Whose fault is it? / वन्य प्राणी आणि मानव संघर्ष: दोष कोणाचा ?

                  दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या कानावर विविध बातम्या येऊन धडकतात. बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी , बिबट्याने शेळ्या पळवल्या , गावात बिबट्या ची दहशत, रानडुक्करांनी पिकांची नासधूस केली. हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू , गव्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी. यामध्ये नक्की कोणाची चूक आहे. त्या वन्यप्राण्यांची का माणसाची ? 


               सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या घटना का वाढू लागल्यात, याचा विचार केला पाहिजे. माणसाला पाहून घाबरणारे वन्यप्राणी आता माणसांवर हल्ला का करतायेत ? ते गावात , शहरात का येतायत ?  त्यांना जंगलात रहायचं नाही का ? तर विचार केला की कळत की वन्य प्राणी गावात , शहरात आले नाहीत तर माणूसच जंगलात गेलाय. हो माणसाला आता भूमी कमी पडू लागली आहे . त्याची वाटचाल आता जंगलाकडे होऊ लागली आहे त्यामुळे जंगल कमी होत आहे. जंगल म्हणजे वन्य प्राण्याचं घर आणि त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढलं जातंय. मग त्यांनी तरी कोठे जायचं ? मग ते गावात , शहरात आले तर चूक त्यांची नाही तर माणसांची आहे. तुमंच घर जर नष्ट केलं तर तुम्ही कुठे जाणार? जंगल त्यांचं घर आहे. माणूस कितीतरी वेगाने जंगल नष्ट करत सुटलाय. 


               शिकारीवर बंदी असली तरी किती तरी छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार केली जाते. अन्नसाखळी मध्ये हे प्राणी कोणाचे तरी भक्ष्य असतात. त्यांना ते मिळाले नाही की मग ते त्यांना शोधण्यासाठी लोकवस्तीत येतात , मग सुरू जातो मानवाशी त्यांचा संघर्ष. 


              मानवाने आपल्या हव्यासापोटी जंगलची जंगल उध्वस्त केली. अमाप वृक्ष तोड केली , रस्ते बांधले. घरे बांधली आयटी पार्क तयार केले. त्यावेळी कशाचाच विचार न करणारी माणसे आता पर्यावरण प्रेमी होण्याचा देखावा करत सुटली आहेत. अशा या बोगस पर्यावरण प्रेमींना आवरलं पाहिजे. सोयी नुसार भुमिका बदलणारे खूप आहेत. वन्य प्राण्यांना दोष देणारे ही खूप सापडतील पण मूळ कारणा कडे दुर्लक्ष करून त्यावर ना बोलता आपल्या सोयीचे काय आहे हे पाहणारी लोक पहिलीत की राग येतो. 


              माणूस हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे. तो आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जातो. काही दिवसांपूर्वी केरळ मधील एक गरोदर हत्तीणीला अननस मधून फटाक्यांची दारू खाऊ घातली गेली. ती हत्तीण किती तरी वेळ पाण्यामध्ये उभी होती. शेवटी तिने प्राण सोडला. काय ही माणसं आणि कसली त्यांची मानसिकता ? गंमत म्हणून काय आणि कसले कसले प्रकार केले जातात. 


               वन्य प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष अटळ आहे. तो संपवायचा म्हटलं तर लगेच नाही संपणार.  कारण ही परिस्थिती येण्यासाठी खूप वर्ष मानवाने निसर्गाची हानी केली आहे. ती लगेच भरून येणारी नाही किव्हा येणारही नाही. योग्य नियोजन करून जंगलाची काळजी घ्यावी लागणार आहे. वन्य प्राण्याचा अधिवास सुरक्षित करावा लागणार आहे. त्यांना सुरक्षित निवारा भेटेल यासाठी प्रयत्न करावा लागेल तरच हा संघर्ष काहीशा प्रमाणात कमी होऊ शकेल. हे सगळं करण्यासाठी चूक / दोष हा मनावाचाच आहे हे आधी आपल्याला मान्य करावे लागेल. मग उपाय योजनांचे नियोजन करावे लागेल. 


Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...