उर्मिला...
रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं...
जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच...
![]() |
एखादी गोष्ट सांगणे आणि विचारणे यात फरक असतो ना..
विचारलं तर समोरच्याच मत विचारात घेतलं जातं.. त्याला होकार किंव्हा नकार द्यायची संधी असते,
पण जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा समोरच्याच मत अपेक्षित नसतं त्याला गृहीत धरलं जात....
प्रत्येक वेळी उर्मिलेला गृहीत धरलं गेलं...
लक्ष्मणाशी लग्न कर हे जनक सांगतात...
( तिचं काय मत आहे विचारले जातं नाही..
सीतेसाठी स्वयंवर केल जात पण तिच्यासाठी....)
मी पण श्रीरामाबरोबर 14 वर्ष वनवासाला जाणार हे लक्ष्मण सांगतो...
( तिच्या परवानगीची त्याला गरज वाटत नाही...)
सोबत जाण्याचा अधिकार तिला न देता, मागे राहणं हेच तिचं कर्तव्य आहे हे ठरवलं गेलं....
वनवास संपवून जेव्हा ते पुन्हा एकत्र आल्यावर सुद्धा लक्ष्मण तिला विचारात न घेता जलसमाधी घेतो....
पुन्हा ती एकटीच...
समाज म्हणतो की उर्मिलेने त्याग केला. पण त्याग कधी असतो माहीत आहे का..?
जेव्हा त्याग करणाऱ्याला ' नाही ' म्हणण्याचा अधिकार असतो तेव्हा....
इथे उर्मिलेकडे तो अधिकारच नाही. तिच्या आयुष्यातले निर्णय आधीच घेतले गेले आणि तिला फक्त त्यांना स्वीकारायला सांगितले....
रामायणात उर्मिला लक्ष्मणाची पत्नी म्हणून नव्हे तर फक्त एक स्त्री म्हणून होती, ती सगळं ऐकत होती, पाहत होती, प्रत्येक वाक्य तिच्या आयुष्यावर कोरलं जात होतं, पण तिच्यासाठी एकही वाक्य नव्हतं....
" तुला काय हवं आहे ?”
पण सगळं ऐश्वर्य असूनही ऐन तारुण्यात नवरा सोबत नसल्याचं दुःख....
ती तारुण्याची 14 वर्ष अपार संयमाने जाळते...
कोणीही तिच्या विरहाची गणना केली नाही कारण तिचा विरह, तिचा एकटेपणा दिसत नव्हता. ...
ती फक्त शांतपणे जगत होती आणि शांत गोष्टी नेहमीच दुर्लक्षित राहतात.
सीतेचं दुःख आपल्याला मोजता येतं, कारण ते दिसत.( वनवास, अपहरण, अशोकवन, अग्निपरीक्षा)
पण उर्मिलेचं दुःख मोजता येत नाही कारण ते दिसत नाही...
खरं सांगायचं तर बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं असतं पण स्वतःच्या शांत एकटेपणाशी लढणं खूप कठीण असतं. म्हणूनच उर्मिलेचा त्याग कमी नाही...
तो फक्त दिसत नाही आणि जे दिसत नाही ते जगाला मान्य नसतं...
समाज कोणाला महान ठरवतो माहीत आहे का ज्याच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि तो दिसतो, सीतेचा संघर्ष दिसतो आणि या उलट उर्मिलेचा संघर्ष दिसत नाही...
म्हणूनच समाज त्याला संघर्ष मानायलाच तयार नाही...
सीतेच्या आयुष्यात मोठं मोठे संघर्ष आले तिने त्यांचा सामना केला..पण उर्मिलेला प्रत्येक छोट्या क्षणांना सामोरे जावं लागलं...
कधी कधी हे छोटे क्षणच जास्त जड असतात कारण ते सतत जगावे लागतात....
संपूर्ण आयुष्यात स्त्री स्वतः साठी कधी जगते का ?
वडिलांना काय वाटेल..?
आईला काय वाटेल..?
नवऱ्याला काय वाटेल.. ?
सासू ला काय वाटेल.. ?
मुलांना काय वाटेल.. ?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे
समाजाला काय वाटेल.. ?
या सगळ्यांचा विचार करत ती स्वतःला काय वाटतं हेच विसरून जाते... स्वतःसाठी जगायचं राहून जातं...
सगळ्यांच्या आवडी निवडी जपताना ती स्वतःला नक्की काय आवडत हेच विसरते...
उर्मिलेला ( आजच्या स्त्रीला ) पत्नी म्हणून पतीचं वर्चस्व नको असत. आणि पती रक्षणकर्ता म्हणूनही नको असतो...
तिला तिचा पती आयुष्यात सहचर म्हणून हवा असतो.
प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून प्रेम हवं असतं.
संवाद हवा असतो...
एकमेकांची काळजी घेणं, आवडनिवड बघणं...
एकमेकांप्रती आदर हवा असतो...
आज ही समाजात आपल्याला उर्मिला आढळते. जी नात्याच्या, प्रेमाच्या नावाखाली कायम तडजोड करत राहते... समजून घेते, स्वतःला कायम मागे ठेवते, स्वतःच अस्तित्व विसरून जाते, आणि समाज त्याला समजूतदारपणा , त्याग अशी सुंदर नाव देतो.
मी सुद्धा स्त्रियांना गृहीत धरत आलो आणि आजही धरतो पण आता कळतंय ते चुकीचं आहे....
हे उर्मिला वाचताना जाणवलं मला....
( ' उर्मिला ' हे पुस्तक वाचत असताना मी उर्मिलेबाबत आणखीही लेख वाचले...
त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हा लेख...)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा