दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या कानावर विविध बातम्या येऊन धडकतात. बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी , बिबट्याने शेळ्या पळवल्या , गावात बिबट्या ची दहशत, रानडुक्करांनी पिकांची नासधूस केली. हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू , गव्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी. यामध्ये नक्की कोणाची चूक आहे. त्या वन्यप्राण्यांची का माणसाची ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या घटना का वाढू लागल्यात, याचा विचार केला पाहिजे. माणसाला पाहून घाबरणारे वन्यप्राणी आता माणसांवर हल्ला का करतायेत ? ते गावात , शहरात का येतायत ? त्यांना जंगलात रहायचं नाही का ? तर विचार केला की कळत की वन्य प्राणी गावात , शहरात आले नाहीत तर माणूसच जंगलात गेलाय. हो माणसाला आता भूमी कमी पडू लागली आहे . त्याची वाटचाल आता जंगलाकडे होऊ लागली आहे त्यामुळे जंगल कमी होत आहे. जंगल म्हणजे वन्य प्राण्याचं घर आणि त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढलं जातंय. मग त्यांनी तरी कोठे जायचं ? मग ते गावात , शहरात आले तर चूक त्यांची नाही तर माणसांची आहे. तुमंच घर जर नष्ट केलं तर तुम्ही कुठे जाणार? जंगल त्यांचं घर आहे. माणूस कितीतरी वेगाने जंगल नष्ट करत सुटलाय.
शिकारीवर बंदी असली तरी किती तरी छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार केली जाते. अन्नसाखळी मध्ये हे प्राणी कोणाचे तरी भक्ष्य असतात. त्यांना ते मिळाले नाही की मग ते त्यांना शोधण्यासाठी लोकवस्तीत येतात , मग सुरू जातो मानवाशी त्यांचा संघर्ष.
मानवाने आपल्या हव्यासापोटी जंगलची जंगल उध्वस्त केली. अमाप वृक्ष तोड केली , रस्ते बांधले. घरे बांधली आयटी पार्क तयार केले. त्यावेळी कशाचाच विचार न करणारी माणसे आता पर्यावरण प्रेमी होण्याचा देखावा करत सुटली आहेत. अशा या बोगस पर्यावरण प्रेमींना आवरलं पाहिजे. सोयी नुसार भुमिका बदलणारे खूप आहेत. वन्य प्राण्यांना दोष देणारे ही खूप सापडतील पण मूळ कारणा कडे दुर्लक्ष करून त्यावर ना बोलता आपल्या सोयीचे काय आहे हे पाहणारी लोक पहिलीत की राग येतो.
माणूस हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे. तो आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जातो. काही दिवसांपूर्वी केरळ मधील एक गरोदर हत्तीणीला अननस मधून फटाक्यांची दारू खाऊ घातली गेली. ती हत्तीण किती तरी वेळ पाण्यामध्ये उभी होती. शेवटी तिने प्राण सोडला. काय ही माणसं आणि कसली त्यांची मानसिकता ? गंमत म्हणून काय आणि कसले कसले प्रकार केले जातात.
वन्य प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष अटळ आहे. तो संपवायचा म्हटलं तर लगेच नाही संपणार. कारण ही परिस्थिती येण्यासाठी खूप वर्ष मानवाने निसर्गाची हानी केली आहे. ती लगेच भरून येणारी नाही किव्हा येणारही नाही. योग्य नियोजन करून जंगलाची काळजी घ्यावी लागणार आहे. वन्य प्राण्याचा अधिवास सुरक्षित करावा लागणार आहे. त्यांना सुरक्षित निवारा भेटेल यासाठी प्रयत्न करावा लागेल तरच हा संघर्ष काहीशा प्रमाणात कमी होऊ शकेल. हे सगळं करण्यासाठी चूक / दोष हा मनावाचाच आहे हे आधी आपल्याला मान्य करावे लागेल. मग उपाय योजनांचे नियोजन करावे लागेल.