The greatest Master /जीवनात सर्वात मोठा गुरु काळ असतो...
माणूस जन्माला आला की त्याच शिक्षण सुरू होते. घरी त्याचा पहिला गुरु आई असते. शाळेला प्रारंभ झाला की शिक्षक त्याचे गुरू होतात. ज्याच्या कडून आपण काही तरी नवनवीन शिकत असतो ते आपले गुरू असतात. गुरू फक्त शाळेतच भेटत नाही तर ते आयुष्याच्या वाटेवर खूप ठिकाणी भेटतात आणि आपल आयुष्य नवनव्या गोष्टीनी भरून टाकतात. जगण्याची प्रेरणा देतात. नवीन काहीतरी करण्याची उर्मी आपल्यात निर्माण करतात. पण या सगळ्या जीवन प्रवासात खूप काही शिकवून जाणारा एक मोठा गुरू असतो. त्याचं नाव काळ, वेळ हो काळचं.....
जीवनात माणसं ओळखायला कोण शिकवत असेल तर तो म्हणजे काळ. आपली माणस कोणती , आपल्याला संकटात अडकवणारी कोण आहेत. संकटातुन बाहेर काढणारी कोण , मदत करणारे कोण याची एकदम अचूक उत्तर देणारा गुरू म्हणजे काळ.
आपली क्षमता नक्की काय आणि किती हे आपल्याला सप्रमाण दाखवून देतो तो काळ. विविध प्रसंगांना कसं सामोरं जायचं ते काळ शिकवतो.
जीवनात येणारी संकट ही कितीही मोठी असली तरी ती आपल्या आयुष्यापेक्षा मोठी असत नाहीत. हे नेहमी सांगणारा हा गुरू असतो. आपल्यावर दुःखाचा डोंगर जरी कोसळला तर काय करायचा. तर संयम ठेवायचा आणि काही काळ शांत राहायचं. त्यामुळे त्या दुःखाची तीव्रता कमी होते. कमी झालेली तीव्रता आपल्याला जाणवते पण त्यासाठी काही काळ दयावा लागतो. जीवनात अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडत नाही त्याची उत्तरे कोणाकडेच मिळत नाही. आपण त्या प्रश्नांनमध्ये गुरफटून जातो. हाती काहीच लागत नाही अशा वेळी एक करायचं वेळ जाऊ द्यायचा आणि हा जाणार वेळच/ काळच आपल्याला त्यांची उत्तरे देतो.
काळ आपल्याला खूप काही शिकवत असतो. पण आपली शिकण्याची वृत्ती असायला हवी. श्रीमंतीत माजू नये आणि गरिबीत लाजू नये. हे शिकवण्याचं महत्त्वाचे काम करतो तो म्हणजे काळ. आपली खरी ओळख आपल्यालाच करून देण्याच काम काळ करत असतो. खूप असे प्रसंग जीवनात येतात की त्यावेळी आपले निर्णय चुकतात. पण त्यातून शिकण्यासाठी मदत करतो तो म्हणजे काळ.
अनुभवा सारखा गुरू नाही. पण विविध अनुभव देण्याचं काम काळ करत असतो. काळ खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतो. त्याच्या भट्टीत आपलं आयुष्य तावून सुलाखून निघत. भरपूर अनुभव देऊन आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याचं काम काळ करत असतो. हे काम निरंतर चालू असते.
जीवनात आपल्याला अनेक गुरू लाभतात. त्यामध्ये कोणी मोठा कोणी छोटा असत नाही. गुरू हा गुरुच असतो. लहान मोठा असं काही असत नाही. जो नवनवीन ज्ञान देतो तो गुरू. मग आपण ज्ञानाला लहान मोठं ठरवू शकतो का ? तर नाही ना. कारण कोणतं शिक्षण कुठे उपयोगी पडेल हे आपण सांगू शकत नाही. मग आपण हा गुरू मोठा तो गुरू लहान अस म्हणू शकत नाही. जो तो आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो.