छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासने ही काळाची गरज आहे. महापुरुषांचा इतिहास हा फक्त परीक्षेत मार्क घेण्यासाठी अभ्यासायचा नसतो. तर तो आपल जीवन समृद्ध करण्यासाठी वाचायचा असतो. आपण इयत्ता चौथी च्या वर्गापासून छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकण्यास सुरुवात करतो.
शिवचरित्रातून नक्की काय शिकावं.....
१. यशाचा आणि वय , अनुभवाचा काही संबंध नसतो :-
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना अवघ्या पंधराव्या वर्षी केली. स्वराज्य निर्माण करण्याच पहिलं पाऊल त्यांनी या वयात टाकलं. तोरणा जिंकला तेव्हा त्याचं वय काय होत ? त्याला महत्त्व नाही महत्व आहे ते त्यांच्या कर्तृत्वाला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली तेव्हा तरी त्याचे वय काय होते. त्यामुळे मी खूप लहान आहे, मला काहीच आणि कशाचाही अनुभव नाही. मी आता काय करणार ? हा न्यूनगंड बाळगणं सोडून द्यायला शिवचरित्र शिकवत.
२. सुरुवात करा आणि सुरू ठेवा
रायरेश्वरची शपथ घेऊन स्वराज्य स्थापन केलं तेव्हा शिवरायां बरोबर दहा पंधरा मावळे होते पण त्यांनी सुरुवात केली आणि ती सतत घोडदौड सुरू ठेवली. पुढं एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. कोणतंही आणि कितीही मोठं काम असू द्या तुम्ही सुरुवात करा. अगदी छोट्या गोष्टी पासून केली तरी चालेल. सतत ते काम करत रहा तुम्ही मोठ्या उंचीवर जाऊन पोहचाल.
३. स्पर्धा मोठी आहे स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरून जाऊ नका.
मुघल , निजामशहा , आदिलशाहा हे खूप मोठे शत्रू होते पण महाराज यांना घाबरले नाहीत. त्यांनी त्यांचा युक्तीने सामना केला. आयुष्यात कितीही मोठं संकट आले तरी त्याला धाडसाने तोंड द्या. संकटांना घाबरून , पाठ दाखवून पळून जाऊ नका. आपली सगळी शक्ती पणाला लावून त्यातून बाहेर पडा.
४. कष्ट करा. ध्येय बाळगा. अंधश्रद्धा सोडा.
कोणत्याही लढाईला जाताना महाराजांनी निष्पाप प्राण्यांची हत्या केली नाही. का कसलाही मुहूर्त काढला नाही. योग्य नियोजन , अफाट कष्ट केलं तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. आपला आपल्या क्षमतेवर विश्वास हवा. कष्ट करण्याची ताकत हवी. अंधश्रद्धा न बाळगता स्वतःवर श्रध्दा ठेवावी आणि कामाला लागावं.
५. मोठ्या संकटांना घाबरू नका. स्वतः पुढे व्हा.
अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की आता संपलं सगळं पण महाराज त्यावेळी स्वतः त्याला सामोरे गेले. शांत राहून प्रत्येक निर्णय अगदी योग्य काळजी घेऊन घेतला आणि संकटाचाच नाश केला. आपल्या जीवनात कितीही मोठं संकट आले तरी घाबरायचं नाही. शांत राहून परफेक्ट नियोजन करून त्यावर मात करायची.
६. उपलब्ध साधनसामग्रीचा अतिशय सुयोग्य वापर.....
मुघल, आदिलशहा याचं सैन्य कितीतरी मोठे होते. त्या मानाने महाराजांचे सैन्य खूपच कमी पण त्यांचा योग्य वापर त्यांनी केला. आपल्या कडे कोणती साधन आहे ते पहा आणि त्याचाच अतिशय कुशलतेने वापर करून यश खेचून आणा.
७.कधी कधी माघार घेणे सुद्धा आवश्यक....
महाराजांनी कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेतली. आपल होणार नुकसान टाळलं जात आणि नव्याने तयारी करण्याची संधी आपल्याला मिळते. कधी माघार घ्यावी लागली तर कमीपणा वाटून घेऊ नका. एखाद्या काम नाही जमल तर ते लवकर सोडा आणि दुसरं सुरू करा. माघार घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. नवनवे मार्ग शोधा.
८. सहकारी चांगले निवडा..
महाराज तुम्ही जा मी खिंड रोखून धरतो. आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारी आणि महाराजां साठी जीव ओवाळून टाकणारी माणसं होती. हे सहकारी म्हणजे महाराजांची खरी ताकद होती. तुमचे सहकारी कसे आहे हे पहा. योग्य ते मित्र निवडा. जे तुम्हांला संकटात मदत करतील त्यासाठी चांगली माणसे जोडा.
९. सर्वोत्तम राजनीती...
आजवर इतिहासाने शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणारे योध्ये पाहिले पण शत्रूच्या हातावर मिठाई देऊन निसटणारा एकच योद्धा इतिसाने पाहिला तो म्हणजे छत्रपती शिवराय. औरंगजेबाच्या अडीच ते तीन लाख फौजेच्या नजर कैदेतून रक्ताचा एक ही थेंब न सांडता महाराज एकदम सुरक्षित रायगडावर पोहोचले. जगाच्या इतिहासात अशी राजनीती करणारा राजा एकच आहे.
खूप साऱ्या गोष्टी आहेत शिवचरित्रात ज्याला ज्या घेता येतील त्या घ्या. त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करा.
जेव्हा जेव्हा आयुष्यात आपण हरलोय , सगळं संपलंय अस वाटेल तेव्हा शिवचरित्र वाचावं. पुन्हा संकटाना सामोरे जाण्याची आणि जगण्याची नवी उमेद निर्माण होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा