" लढण्याचा इतिहास आमचा
हरणे माझ्या रक्तात नाही ,
जोपर्यंत मैदानात उभा मी
जिंकणं नियतीला शक्य नाही . "
🚩🚩🚩🚩
पावनखिंड पाहिला. एक नंबर आहे. प्रत्येकानं दिलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय.
पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा पडलेला वेढा...
हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना....
ही योजना यशस्वी व्हावी आणि शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी गंगाधरपंतांनी केलेल काम .....
महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद....
महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल......
तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू ....
एक एक प्रसंग पाहिला आणि संवाद ऐकला की अंगावर काटा उभा राहतो.
चित्रपट सुरू झाला की महाराजांचे वाक्य कानावर पडत. " या राज्याभिषेकामागे बलिदानाची फार मोठी परंपरा आहे ". 🚩
महाराज गडावरून खाली आल्यानंतर जेव्हा शिवा काशीद आणि महाराजांची वाट वेगळी होते तेव्हा महाराज आपल्याबरोबर बोलावत असूनही शिवाकाशीद योजनेप्रमाणे पालखीत बसण्यासाठी जाताना म्हणतो मी आता स्वर्गाच्या वाटेकडे निघालोय राजं...
त्याच वेळी " रणी निघत शूर..." हे सुरू झालेले गाणं डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून देण्यास भाग पाडत.
पावनखिंड मध्ये पोहोचल्यावर बाजीप्रभू महाराजांना पुढे जायला सांगतात आणि महाराज कोणालाही सोडून जायला तयार नसतात त्या वेळी महाराजांना बाजी म्हणतात....
"पांडुरंगासोबत त्याच्या भक्तांचं जसं नाव घेतलं जातं तसं तुमच्यासोबत आमचं नाव घेतलं जाईल "
" हा सोहळा साजरा करू द्या राजं...."
पावनखिंडीतील लढाई पाहिली आणि तेथील प्रसंग पाहिले की
'राजा शिवछत्रपती ' मधील काही ओळी आठवतात...
" तोफे आधी मरे न बाजी
सांगा त्या मृत्यूला..... "
" हा देह अर्पिला शिवबाला
हा देह अर्पिला स्वराज्याला
पडेल तेंव्हा तो धारातीर्थी
जेव्हा राजा पोहोचेल विशाली
हा क्षण अखेरचा आला
तोफा ऐकण्यास जीव आतूरला
शेवटचा मुजरा राज तुम्हांला ...
डाव अर्धा सोडुनी बाजी चालला."
" पावनखिंडीतील मातीला सुगंध आहे बाजीच्या त्यागाचा , त्या मातीला रंग आहे बाजीच्या रक्ताचा , तेथील जमिनीला कान लावला तर आजही आवाज येईल बाजीच्या तोंडातून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा .....
' हर हर महादेव ." 🚩
सिद्दी जौहर म्हणून समीर धर्माधिकारी यांने मस्त काम केलंय. सिद्दी जौहर ला आदिलशाहीत असलेला विरोध. कोणीच महाराजांवर जाण्यास तयार नसल्यामुळे त्याला पाठवण्यामागे तो जिंकला तरी फायदा आणि मेला तरी फायदा असा बड्या बेगमेने केलेला विचार. ही एक नवीन गोष्ट कळली.
वैभव मांगले यांनी हुशार आणि बेरकी गंगाधरपंत कमाल उभे केलेत.सिद्दीच्या प्रचंड वेढ्यात दोन माणसांनिशी जाणं किती धोकादायक असेल हा विचार कधी केला नव्हता. गंगाधरपंत यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जौहरला गाफील ठेवण्यात वापरलेलं कसब नाद आहे.
बाजीप्रभु यांच्याबरोबर, बांदल देशमुख आणि मावळातील शुर मावळे लढले. त्यात शिवरायांचे मेव्हणे शंभुसिंग जाधव हेही होते. ही गोष्ट नव्याने समजली.
हरीश दुधाने यांनी बहिर्जी नाईक म्हणून कमाल काम केलंय
चिन्मय मांडलेकर यांनी उभे केलेले महाराज म्हणजे तर नाद आहेत. सैनिकांवर असलेलं महाराजांचं प्रेम, विश्वास साकारण्यात , त्यांना स्फुरण देताना ' हर हर महादेव ' ही गर्जना करताना, कर्तव्यापोटी त्यांना मृत्यूला सामोरं जाताना पाहून महाराजांच्या जीवाची होणारी तगमग. बाजींना सोडून जाताना होणारी घालमेल, वेढा फोडून विशाळगडावर गेल्यावर आधी तोफा वाजवण्यासाठीची धडपड.
सगळं भारीच......
बाजीप्रभूची भूमिका करणारे अजय पुरकर हे तर अक्षरशः बाजीप्रभू जगलेत. अजून कोणी त्या भूमिकेला न्याय देऊ शकलं नसतं. अस वाटतं राहत. संवाद तर नाद आहेत.....
' चल .....'
' बाजूला व्हा .......'
चेहऱ्यावच्या भावना ..
महाराज सांगतात बाजी आपण भेटणार आहोत. त्यावेळी बाजींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि डोळ्यातून येणार पाणी खरंच अफलातून भूमिका केलीय.
तो युद्धावेश, ती तलवारबाजी चा प्रसंग साकारताना बाजी डोळ्याचं पारणं फेडतात...
युद्धप्रसंग दाखवणं अतिशय अवघड आणि ते ही अधिकाधिक वास्तविक कसे होतील यासाठी केलेला प्रयत्न....
त्यातून ही लढाई संपूर्ण पावसापाण्यात आणि जंगलात झाली. ती दाखवलीये पण तशीच....
या सगळ्यांसाठी दिग्पाल लांजेकरांचं कौतुक.....
बाजीप्रभू देशपांडें आणि त्यांच्या सोबतच फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंह जाधव, शिवा काशीद आणि बांदल सेनेतील त्या ६०० मावळ्यांचे शौर्य डोळ्यासमोर उभं करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो...
सगळ्यांच कलाकारांनी आपल्या भूमिका साकारल्या नाहीत तर ते त्या भूमिका खरोखरचं जगले आहेत. अस वाटत. एकेक वाक्य आणि प्रसंग डोळ्यासमोरून जात नाहीये.
दिग्पाल लांजेकरांनी ठरवलेल्या शिवाष्टेक मधील हा तिसरा चित्रपट......
आधीच्या चित्रपटां पेक्षा अधिकाधिक भव्य आणि दिव्य केलाय....
यामुळे आता पुढील चौथ्या चित्रपटाची आतुरता खूपच वाढलीय......
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩