शनिवार, १९ मार्च, २०२२

The Kashmir Files .. 'द काश्मीर फाईल्स.....

 


द काश्मीर फाईल्स.....


 काश्मीर मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना  क्रमाक्रमानं वाढत गेलेला दहशतवाद...

 मिळत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडं केंद्र सरकारनं केलेलं दुर्लक्ष .....

१९ जानेवारी १९९०  या तारखेच्या काही काळ आधी काश्मिरी पंडितांना दिल्या जाणाऱ्या धमक्या....

  इस्लामचा स्वीकारा , नसेल तर इथून निघा,  नाहीं तर मरा....

 मशिदींच्या भोंग्या मधून दिल्या जाणाऱ्या धमक्या .....

 सामूहिक हत्या, बलात्कार हे आधीपासून काश्मीर मध्ये घडत होते पण या सर्वांची गाठलेली चरणसीमा......

१९ जानेवारी १९९० या दिवसाच्या आधी ४८ तास आधी काश्मिरी पंडितांना वरीलपैकी एक  निवडायला सांगितलेला एक पर्याय..... 

पेटवण्यात आलेली घर ... 

उध्वस्त करण्यात आलेली मंदिर.... 

सामूहिक खून, बलात्कार, सक्तीची केलीजाणारी धर्मांतर..... 

जीव वाचवण्यासाठी आपली घरं सोडून अंगावरच्या कपड्यानिशी पळून जाव लागणारे काश्मीरी पंडित..... 


चित्रपट सुरू होतो ,  हळू हळू विषयाची पकड घेत त्याची तीव्रता वाढत जाते. सगळ्यात भयानक आणि शंभर टक्के सत्य घटनेनं त्या चित्रपटाचा शेवट होतो. एक  'कलाकृती'म्हणून सुद्धा हा  चित्रपट असामान्य आहे. चित्रपट पाहिला की माणूस ब्लॅंक होतो. 



हा चित्रपट डावी विचारसरणी , डावे विचारवंत, काही नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक, काही पत्रकार, लेखक हे सगळे मिळून एक एकोसिस्टम   तयार करतात आणि त्याचा शिक्षण क्षेत्रावर कसा  प्रभाव असतो त्यातून नक्षलवाद आणि  डाव्या अतिरेकी चळवळीला कसा पाठिंबा देतात, याचं नेमकं चित्रण करतो. हा डावा विचार म्हणजे नक्की काय तर हा डावा विचार 'राष्ट्रवादा'ला विरोध करतो तर खूप वेळा तो  देशद्रोह्यांची बाजू घेतो. JNU मध्ये तरी  नक्की काय चालतय 

  'भारत तेरे टुकडे हजार'  अफजल गुरूच 'बलिदान वर्ष' साजर.

' फ्री काश्मीर...' 

 'अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है' अशा घोषणा दिल्या जातात.

     भारतीय सैन्य काश्मिरी जनतेवर अत्याचार करतं असा प्रचार JNU मधले तथाकथित विद्यार्थी नेते करतात. तरुणाचं ब्रेनवॉश कसं केलं जातं,  या डाव्या पुरोगामित्वाकडे वळणाऱ्या तरुणपिढीला हे नक्की कोण आहेत ह्याचं खर रूप काय आहे हे दाखवण्यात विवेक अग्निहोत्री आणि काश्मीर फाईल्स यशस्वी होतो. 


        " फेक न्यूज दिखाना इतना खतरनाक नही है, जितना रिअल न्यूज छुपाना हे. "

सत्य चित्रपट पहात असताना जाणवतं. 



   त्या वेळी काही न्यूज चॅनेल आणि काही बुद्धिमान पत्रकार या घटनेची मांडणी अशी करतात की  काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याक असलेले काश्मिरी पंडित श्रीमंत होते. तिथले उद्योगधंदे त्यांच्या हातात होते. त्यांनी गरीब मुस्लिमांवर केलेल्या अत्याचाराची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं घडल आहे.  अजूनही युट्युबवर याच्या क्लिप्स आहेत. 30 - 32  वर्षे देशाला 'जणू काही घडलंच नाही' असं दाखवण्यात यशस्वी झालेल्यांच पितळ ह्या चित्रपटाने उघड केलं आहे. 


1990 ला ही घटना घडली म्हणजे भारत स्वतंत्र होऊन 43 वर्ष होतात. लोकशाही सरकार असताना काश्मीरी पंडितांचं संरक्षण आपली राज्यघटना, आपली सरकारी यंत्रणा का करू शकली नाही. हा प्रश्न मनात घर करतो. आजही काश्मिरी पंडितांचे प्रश्न का सुटले नाहीत. अशा वेळी या सरकारी यंत्रणां बद्दल साशंक वाटतं.


इस्लामिक दहशतवादाला लवकर वेसण घातली नाही तर पुढे काय ? ह्याच उत्तर शोधण्यास हा सिनेमा भाग पाडतो.


का पहावा 'काश्मीर फाईल्स'


1. 19 जानेवारी 1990 नक्की काय झालं होतं हे कळण्यासाठी .....

2. आपल्या पासून नक्की काय लपवल जातंय हे कळण्यासाठी.....

3. अजेंडा म्हणजे काय आणि तो कसा राबवला जातोय हे कळण्यासाठी.....

4.  काहींन साठी जो सोईस्कर इतिहास आहे तोच कसा खरा आहे हे इतरांवर कसं बिंबवलं जात हे पाहण्यासाठी.....

5. सत्य म्हणजे जे मीडिया सांगतो किंव्हा तथाकथित बुद्धीमंत सांगतात ते नसत तर ते खूप वेगळं आणि विदारक असत हे कळण्यासाठी.....

6. एखाद्यावर अन्याय झाला आणि मग त्याने हातात शस्त्र घेतलं कीं तो हिरो असतो हे आपण हिंदी फिल्म मध्ये पहातो. त्याच समर्थन करतो.

पण हातात हत्यार न घेता कायद्यावर विश्वास असणारे पंडित पळकुटे , घाबरट असतात का ? ह्याच उत्तर शोधण्यासाठी .....

7. राज्यकर्ते जर नालायक असतील तर प्रशासन किती हतबल होत आणि सर्वसामान्याचे कसे भयानक हाल होतात हे समजण्यासाठी....

8. कलम 370 आणि 35 अ रद्द का केलंय , त्याची किती गरज होती हे नव्यानं समजण्यासाठी...

9. दहशतवादाला डाव्या विचारांच्या आणि फार  मोठ्या घटकाचा पाठिंबा कसा असतो काही शिक्षणसंस्था यांना कसं प्रोटेक्त करतात......

10. इस्लामिक दहशतवाद म्हणजे नक्की काय असतो .....



 विवेक अग्निहोत्रीचा '  द ताश्कंद फाईल्स ' हा चित्रपटदेखील पाहण्यासारखा आहे.  जानेवारी १९६६ मध्ये 'ताश्कंद' या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिखर परिषद होते . ताश्कंद करारावर सही झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १० जानेवारी १९६६ ला भारताचे कर्तबगार पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांचा तिथंच मृत्यू होतो.  हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात. या घटनेची वेगळी बाजू नक्की काय आहे हे त्याने उपलब्ध कागद-पुराव्यांवरून  मांडल आहे. 







रविवार, १३ मार्च, २०२२

Pavankhind ' A great Film .... पावनखिंड : एक उत्तम कलाकृती

     " लढण्याचा इतिहास आमचा 

        हरणे माझ्या रक्तात नाही ,

        जोपर्यंत मैदानात उभा मी

        जिंकणं नियतीला शक्य नाही . "


            🚩🚩🚩🚩


पावनखिंड पाहिला. एक नंबर आहे. प्रत्येकानं दिलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय.


पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा पडलेला वेढा... 

हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना....

ही योजना यशस्वी व्हावी आणि शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी गंगाधरपंतांनी केलेल काम  .....

महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद....

महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल......

तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू .... 


एक एक प्रसंग पाहिला आणि संवाद ऐकला की अंगावर काटा उभा राहतो. 


चित्रपट सुरू झाला की महाराजांचे वाक्य कानावर पडत.  " या राज्याभिषेकामागे बलिदानाची फार मोठी परंपरा आहे ". 🚩



महाराज गडावरून खाली आल्यानंतर जेव्हा शिवा काशीद आणि महाराजांची वाट वेगळी होते तेव्हा महाराज आपल्याबरोबर बोलावत असूनही शिवाकाशीद योजनेप्रमाणे पालखीत बसण्यासाठी जाताना म्हणतो मी आता स्वर्गाच्या वाटेकडे निघालोय राजं... 

 त्याच वेळी " रणी निघत शूर..." हे  सुरू झालेले गाणं डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून देण्यास भाग पाडत.


पावनखिंड मध्ये पोहोचल्यावर बाजीप्रभू महाराजांना पुढे जायला सांगतात आणि महाराज कोणालाही सोडून जायला तयार नसतात त्या वेळी महाराजांना बाजी म्हणतात....

"पांडुरंगासोबत त्याच्या भक्तांचं जसं नाव घेतलं जातं तसं तुमच्यासोबत आमचं नाव घेतलं जाईल " 


" हा सोहळा साजरा करू द्या राजं...."


पावनखिंडीतील लढाई पाहिली आणि तेथील प्रसंग पाहिले की 

'राजा शिवछत्रपती ' मधील काही ओळी आठवतात...

 

" तोफे आधी मरे न बाजी 

               सांगा त्या मृत्यूला..... "


 "  हा देह अर्पिला शिवबाला 

    हा देह अर्पिला स्वराज्याला

          पडेल तेंव्हा तो धारातीर्थी

          जेव्हा राजा पोहोचेल विशाली 

    हा क्षण अखेरचा आला 

    तोफा ऐकण्यास जीव आतूरला 

       शेवटचा मुजरा राज तुम्हांला ...

       डाव अर्धा सोडुनी बाजी चालला." 


 " पावनखिंडीतील मातीला सुगंध आहे बाजीच्या त्यागाचा , त्या मातीला रंग आहे बाजीच्या रक्ताचा , तेथील जमिनीला कान लावला तर आजही आवाज येईल बाजीच्या तोंडातून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा  .....

' हर हर महादेव ." 🚩

   

    

      सिद्दी जौहर म्हणून समीर धर्माधिकारी यांने मस्त काम केलंय. सिद्दी जौहर ला आदिलशाहीत असलेला विरोध. कोणीच महाराजांवर जाण्यास तयार नसल्यामुळे त्याला पाठवण्यामागे  तो जिंकला तरी फायदा आणि मेला तरी फायदा असा बड्या बेगमेने केलेला विचार.  ही एक नवीन गोष्ट कळली. 


      वैभव मांगले यांनी हुशार आणि बेरकी गंगाधरपंत कमाल उभे केलेत.सिद्दीच्या प्रचंड वेढ्यात दोन माणसांनिशी जाणं किती धोकादायक असेल हा विचार कधी केला नव्हता. गंगाधरपंत यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जौहरला गाफील ठेवण्यात वापरलेलं कसब नाद आहे. 


बाजीप्रभु यांच्याबरोबर, बांदल देशमुख आणि मावळातील शुर मावळे लढले. त्यात शिवरायांचे मेव्हणे शंभुसिंग जाधव हेही होते. ही गोष्ट नव्याने समजली. 


हरीश दुधाने यांनी बहिर्जी नाईक म्हणून  कमाल काम केलंय


चिन्मय मांडलेकर यांनी उभे केलेले महाराज म्हणजे तर नाद आहेत.  सैनिकांवर असलेलं महाराजांचं प्रेम, विश्वास साकारण्यात , त्यांना स्फुरण देताना ' हर हर महादेव ' ही गर्जना करताना, कर्तव्यापोटी त्यांना मृत्यूला सामोरं जाताना पाहून महाराजांच्या जीवाची होणारी तगमग. बाजींना सोडून जाताना होणारी घालमेल,  वेढा फोडून विशाळगडावर गेल्यावर आधी तोफा वाजवण्यासाठीची धडपड. 

सगळं भारीच......


 बाजीप्रभूची भूमिका करणारे अजय पुरकर हे तर अक्षरशः बाजीप्रभू जगलेत. अजून कोणी त्या भूमिकेला न्याय देऊ शकलं नसतं. अस वाटतं राहत.  संवाद तर नाद आहेत..... 


 ' चल .....'


 ' बाजूला व्हा .......' 


चेहऱ्यावच्या भावना ..



महाराज सांगतात बाजी आपण भेटणार आहोत.  त्यावेळी बाजींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि डोळ्यातून येणार पाणी खरंच अफलातून भूमिका केलीय. 

तो युद्धावेश, ती तलवारबाजी चा प्रसंग साकारताना बाजी डोळ्याचं पारणं फेडतात...


युद्धप्रसंग दाखवणं अतिशय अवघड आणि ते ही अधिकाधिक वास्तविक कसे होतील यासाठी केलेला प्रयत्न....

त्यातून ही लढाई संपूर्ण पावसापाण्यात आणि जंगलात झाली. ती दाखवलीये पण तशीच....

या सगळ्यांसाठी दिग्पाल लांजेकरांचं कौतुक.....


बाजीप्रभू देशपांडें आणि त्यांच्या सोबतच  फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंह जाधव, शिवा काशीद आणि बांदल सेनेतील त्या ६०० मावळ्यांचे शौर्य डोळ्यासमोर उभं करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो...



   सगळ्यांच कलाकारांनी आपल्या भूमिका साकारल्या नाहीत तर ते त्या भूमिका खरोखरचं जगले आहेत.  अस वाटत. एकेक वाक्य आणि प्रसंग डोळ्यासमोरून जात नाहीये. 


दिग्पाल लांजेकरांनी ठरवलेल्या शिवाष्टेक मधील  हा तिसरा चित्रपट......

आधीच्या चित्रपटां पेक्षा अधिकाधिक भव्य आणि दिव्य केलाय....


यामुळे आता पुढील चौथ्या चित्रपटाची आतुरता खूपच वाढलीय......



🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

What exactly to learn from Shivacharitra / शिवचरित्रातून नक्की काय शिकावं....

 

            छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासने ही काळाची गरज आहे. महापुरुषांचा इतिहास हा फक्त परीक्षेत मार्क घेण्यासाठी अभ्यासायचा नसतो. तर तो आपल जीवन समृद्ध करण्यासाठी वाचायचा असतो. आपण इयत्ता चौथी च्या वर्गापासून छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकण्यास सुरुवात करतो. 

शिवचरित्रातून नक्की काय शिकावं.....

१. यशाचा आणि वय , अनुभवाचा काही संबंध नसतो :- 

           छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना अवघ्या पंधराव्या वर्षी केली. स्वराज्य निर्माण करण्याच पहिलं पाऊल त्यांनी या वयात टाकलं. तोरणा जिंकला तेव्हा त्याचं वय काय होत ? त्याला महत्त्व नाही महत्व आहे ते त्यांच्या कर्तृत्वाला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली तेव्हा तरी त्याचे वय काय होते. त्यामुळे मी खूप लहान आहे, मला काहीच आणि कशाचाही अनुभव नाही. मी आता काय करणार ? हा न्यूनगंड बाळगणं सोडून द्यायला शिवचरित्र शिकवत.

२. सुरुवात करा आणि सुरू ठेवा

           रायरेश्वरची शपथ घेऊन स्वराज्य स्थापन केलं तेव्हा शिवरायां बरोबर दहा पंधरा मावळे होते पण त्यांनी सुरुवात केली आणि ती सतत घोडदौड सुरू ठेवली. पुढं एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. कोणतंही आणि कितीही मोठं काम असू द्या तुम्ही सुरुवात करा. अगदी छोट्या गोष्टी पासून केली तरी चालेल. सतत ते काम करत रहा तुम्ही मोठ्या उंचीवर जाऊन पोहचाल.

३. स्पर्धा मोठी आहे स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरून जाऊ नका.

           मुघल , निजामशहा , आदिलशाहा हे खूप मोठे शत्रू होते पण महाराज यांना घाबरले नाहीत. त्यांनी त्यांचा युक्तीने सामना केला. आयुष्यात कितीही मोठं संकट आले तरी त्याला धाडसाने तोंड द्या. संकटांना घाबरून , पाठ दाखवून पळून जाऊ नका. आपली सगळी शक्ती पणाला लावून त्यातून बाहेर पडा. 

४.  कष्ट करा. ध्येय बाळगा. अंधश्रद्धा सोडा.

           कोणत्याही लढाईला जाताना महाराजांनी निष्पाप प्राण्यांची हत्या केली नाही. का कसलाही मुहूर्त काढला नाही. योग्य नियोजन , अफाट कष्ट केलं तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. आपला आपल्या क्षमतेवर विश्वास हवा. कष्ट करण्याची ताकत हवी. अंधश्रद्धा न बाळगता स्वतःवर श्रध्दा ठेवावी आणि कामाला लागावं. 

५. मोठ्या संकटांना घाबरू नका. स्वतः पुढे व्हा. 

           अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की आता संपलं सगळं पण महाराज त्यावेळी स्वतः त्याला सामोरे गेले. शांत राहून प्रत्येक निर्णय अगदी योग्य काळजी घेऊन घेतला आणि संकटाचाच नाश केला. आपल्या जीवनात कितीही मोठं संकट आले तरी घाबरायचं नाही. शांत राहून परफेक्ट नियोजन करून त्यावर मात करायची.

६. उपलब्ध साधनसामग्रीचा अतिशय सुयोग्य वापर.....

           मुघल, आदिलशहा याचं सैन्य कितीतरी मोठे होते. त्या मानाने महाराजांचे सैन्य खूपच कमी पण त्यांचा योग्य वापर त्यांनी केला. आपल्या कडे कोणती साधन आहे ते पहा आणि त्याचाच अतिशय कुशलतेने वापर करून यश खेचून आणा.

७.कधी कधी माघार घेणे सुद्धा आवश्यक....

           महाराजांनी कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेतली. आपल होणार नुकसान टाळलं जात आणि नव्याने तयारी करण्याची संधी आपल्याला मिळते. कधी माघार घ्यावी लागली तर कमीपणा वाटून घेऊ नका. एखाद्या काम नाही जमल तर ते लवकर सोडा आणि दुसरं सुरू करा. माघार घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. नवनवे मार्ग शोधा. 

८. सहकारी चांगले निवडा..

           महाराज तुम्ही जा मी खिंड रोखून धरतो. आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारी आणि महाराजां साठी जीव ओवाळून टाकणारी माणसं होती. हे सहकारी म्हणजे महाराजांची खरी ताकद होती. तुमचे सहकारी कसे आहे हे पहा. योग्य ते मित्र निवडा. जे तुम्हांला संकटात मदत करतील त्यासाठी चांगली माणसे जोडा.

९. सर्वोत्तम राजनीती...

           आजवर इतिहासाने शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणारे योध्ये पाहिले पण शत्रूच्या हातावर मिठाई देऊन निसटणारा एकच योद्धा इतिसाने पाहिला तो म्हणजे छत्रपती शिवराय. औरंगजेबाच्या अडीच ते तीन लाख फौजेच्या नजर कैदेतून रक्ताचा एक ही थेंब न सांडता महाराज एकदम सुरक्षित रायगडावर पोहोचले. जगाच्या इतिहासात अशी राजनीती करणारा राजा एकच आहे. 


         खूप साऱ्या गोष्टी आहेत शिवचरित्रात ज्याला ज्या घेता येतील त्या घ्या. त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करा. 

 

          जेव्हा जेव्हा आयुष्यात आपण हरलोय , सगळं संपलंय अस वाटेल तेव्हा शिवचरित्र वाचावं. पुन्हा संकटाना सामोरे जाण्याची आणि जगण्याची नवी उमेद निर्माण होईल. 

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

चिंता करण्यापेक्षा चिंतन करावे....

            चिंता आणि चिता या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात वाईटच आहेत. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते तर चिंता ही जिवंत माणसाला जाळत राहते.  

 

          काहींना चिंता करण्याची सवय असते. ते कायम कशानं कशाच्या चिंतेत असतात. काहीही कारण नसलं तरी ते चिंता करतात. कोणतही संकट आले नाही तरी ते का संकट आले नाही म्हणून चिंता करतात. अस करता करता त्यांना ती सवय लागते ही सर्वात भयानक गोष्ट आहे. चिंता करण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर वेगळेच प्रश्न निर्माण होतात. हे जर होऊ द्यायचं नसेल तर चिंता न करता त्यावर कशी मात करता येईल. हे पाहायला हवं.

 

           चिंता आणि चिंतन यामध्ये नक्की कोणता फरक आहे तर तो म्हणजे एखादा प्रश्न निर्माण झाला की त्याचाच विचार करणं म्हणजे चिंता पण तो प्रश्न कसा सोडवता येईल , त्यावर कशा प्रकारे मात करता येईल हा विचार करणं म्हणजे चिंतन. चिंतन केल्यावर समस्या सुटण्यास मदत होते किंव्हा समस्या सुटतात. पण जर आपण चिंता करत राहिलो तर समस्या आहे तशीच राहते.  मानसिक त्रास होतो. मानसिक समस्या निर्माण होतात. आयुष्य वेगळीकडेचं भरकटत जात. छोट्या छोट्या समस्या मोठ्या होतात. योग्य निर्णय घेता येत नाही. सामाजिक जीवनात आपली पत राहत नाही. हे सगळं कशामुळे घडत तर ते विनाकारण चिंता करण्यामुळे.  

 

          चिंतन हे लाभदायक असते. आपण त्याच्यावरच आपल लक्ष केंद्रीय करावं. कोणत्याही गोष्टी बाबतीत आपण चिंतन करून निर्णय घेतला पाहिजे. चिंतन केल्याने छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे सहज सुटतात. आपली निर्णय क्षमता डेव्हल होते. योग्य वेळी योग्य निर्णय आपल्याला आयुष्यात उच्च स्थानी घेऊन जातात. या सर्वांसाठी चिंतन महत्त्वाची भूमिका बजावते.

 

           कोणतेही समस्या आली तर आपला तिच्याकडे पाहण्याचा    दृष्टिकोन काय आहे त्यावर तिचं गांभीर्य ठरत आपण सकारात्मकतेने पाहिलं की तिच्यात संधी दिसू लागते. नकारात्मक दृष्टीने पाहिलं तर छोटी समस्या पण खूप मोठी होते. तुमचा दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर चिंता तुमच्या आयुष्यात यायला घाबरेल. ती तुमच्या पासून दूर राहील. 

 

 

            लक्षात ठेवा चिंता ना करता चिंतन करण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यायला हवी. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी त्या प्रॉब्लेमचा विचार न करता. त्यातून बाहेर कस पडायचं हा विचार केला पाहिजे. तसं मनाला ट्रेनिंगच द्या. 

           चिंता मुक्ती कडे होणाऱ्या प्रवासाठी तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा.....

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

Marriage: - A rite लग्न :- एक संस्कार

          भारतीय संस्कृती मध्ये विविध संस्कार आहेत त्या पैकी लग्न एक महत्त्वाचा संस्कार आहे. 


          पुरुष आणि स्त्री यांना नैसर्गिकरित्या एकमेकांची गरज असते. ही गरज समाजमान्य रीतीने पूर्ण करण्यासाठी लग्न खूप महत्त्वाची भूमिका बजावते. स्त्री आणि पुरूषाला एकत्र बांधून ठेवते. समाजव्यवस्था योग्य चालायची असेल तर लग्न त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक सजीव हा नैसर्गिकरित्या आपल्या सारखाच सजीव निर्माण करत असतो. ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतर प्राणी ती गरज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पूर्ण करतात. पण माणसाला तसं करता येत नाही तसेच ती पूर्ण करण्यासाठी समाजमान्य पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे लग्न होय. 


         प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घटना असते ते म्हणजे लग्न. योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीशी आपलं लग्न झालं तर आयुष्य सुंदर होऊन जाते. एकमेकांना एकत्रित बांधून ठेवण्याची शक्ती या बंधनात असते. स्त्रीला पूर्ण स्त्रीत्व आणि पुरुषांला पूर्ण पुरूषत्व हे यामुळे लाभत. 


         लग्नामुळे दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंब एकत्र येतात. नात वाढत जात. नवीन माणस जोडली जातात. आपला नात्याचा गोतावळा वाढत जातो.लग्न त्यामध्ये घडणारे विविध विधी साखरपुडा, हळद, कन्यादान, सात फेरे यांमध्ये एक अर्थ दडलेला आहे. लग्न व त्यात केले जाणारे विधी यांची आठवण आयुष्यभर पुरते. 

         आजची पिढी दिवसेंदिवस लग्नाच महत्त्व कमी करत आहे . त्याच पावित्र्य जपत नाही. ते एक पवित्र बंधन न मानता त्याला एक व्यवहार मानत आहे. ही एक आऊट डेटेड कल्पना आहे असं त्यांना वाटत. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना त्यातील गर्भित अर्थ समजावून सांगितला पाहिजे. त्याच पावित्र्य टिकवल पाहिजे. जर ह्याची सुरुवात आपण केली तर पुढील पिढी त्याप्रमाणे वागेल नाही तर आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात येईल. 


         लग्नाचं महत्त्व सर्वात आधी आपण जाणलं पाहिजे आणि इतरांनाही समजावलं पाहिजे. ते किती महत्वाचे आहे हे आजच्या पिढीलाही सांगण्याची जबाबदारी आपली आहे. त्यातील सौंदर्य जपलं पाहिजे. खऱ्या अर्थाने नात्यांची गुंफन करणाऱ्या या सोहळ्याला जपायला हवं. वाढवायला हवं. 


        आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी लग्न हे महत्वाची भूमिका बजावत असत. 

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

Insults and you / अपमान आणि आपण ......

 अपमान आणि आपण.....

 

         कधी तुमचा कोणी अपमान केला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर आहे . होय.

प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग येतो किंव्हा येऊन गेलेला असतो. अशा वेळी खूप वाईट वाटत. आपली खूप चिडचिड होते. आपलं मन नाराज होत हे प्रसंग मनाला लागतात. 

 

          अपमानाचा प्रसंग कधी आपल्या कामाच्या ठिकाणी येतो तर कधी नातेवाईकांच्यात येतो. कधी एखाद्या सरकारी कार्यालयात येतो. कुठेही आला तरी त्याची तीव्रता कमी होत नाही. 

 

          कारण काय असतात तर कधी कमी ज्ञानामुळे  अपमानास्पद वागणूक दिली जाते तर कधी पैसे नाहीत म्हणून आपल्याला अपमानित व्हावं लागतं. अशा वेळी आपण काय करायचं ?

 

खचून जायचे.....

रागवायचे.....

चिडचिड करायची....

भांडण करायचं ......

 

तर नाही. 

 

        अपमानाचा बदला घ्यायचाच पण तो विधायक काम करून. त्यासाठी स्वतःची क्षमता वाढवायची. राग मनात ठेवायचा आणि त्याचं रूपांतर चांगले काम करण्यासाठी करायचा. 

 

घातक चित्रपटातील संवाद आहे

" गुस्से को पालना सिख बेटा,गुस्से को पालना सिख ।" 

 

        आपला अपमान झाल्यावर आपल्याला खूप राग येतो. यात चूक काहीच नाही. हे नैसर्गिक आहे पण त्या रागाचं रूपांतर आपण कसं करतो त्याला महत्त्व आहे. त्याच रूपांतर हिंसक न करता आपण विधायक कामात केलं तर आपण वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो.

 

        सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं त्यांना फुटपात वर,  स्मशानात  राहावं लागलं. खूप त्रास झाला पण जेव्हा त्यांचा नवरा पुन्हा त्यांच्याकडे आला तेंव्हा त्यांनी त्याला दूर लोटलं नाही. उलट त्या म्हणाल्या यांनी घराबाहेर काढलं म्हणूनच मी सिंधू ची सिंधुताई सपकाळ झाले. 

 

काय माईंडसेट असतो या लोकांचा ते कोणत्याही प्रसंगात सकारात्मकच विचार करतात. हे लोक. 

असा माईंडसेट आपण डेव्हलप केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं.

 

        महात्मा गांधींना रेल्वेतून सामनासह बाहेर फेकल. त्यांनी ती रात्र त्या रेल्वे स्टेशनवर थंडीत कुडकुडत काढली. पण या अपमानाचा बदला त्यांनी कसा घेतला ते जगानं पाहिलं. 

 

      जेवताना मीठ मागितले म्हणून भावजयीने टोमणा मारला आणि ताटावरून रागाने तडक उठून भूषण घर सोडून गेला. पुढे तो कविराज भूषण झाला. 

 

         यांनी काय केलं ? तर त्यांनी आपल्या रागाचं , अपमानाचा बदला विधायक काम करून घेतला. रागाचं विधायक कामात रूपांतर करणं हे खूप कमी लोकांना जमतं. ज्यांना हे जमत ते आयुष्याच्या सर्वोच्च स्थानी जाऊन पोहोचतात. 

 

         अपमानाचा बदला विधायकपणे घेतला तर आयुष्यात आपण एक उंची गाठू शकतो. असं जर आपण ठरवलं असेल तर अपमान झाला तरी त्याने काही फरक पडत नाही. 

 

 

        अपमानाने खचून न त्याच विधायक कामात रूपांतर करण्यासाठी लागणारा माईंडसेट डेव्हलप करून उभारी घेण्यासाठी सर्वांना शुभेच्छा.......

 

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

What people will say / काय म्हणतील लोक ......

          लोक काय म्हणतील.....?


जीवन जगताना आपल्या समोर पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे...

लोक काय म्हणतील....

मी जर अस केलं तर लोक काय म्हणतील, मी असा वागलो तर लोक काय म्हणतील. व्यवसाय निवडताना, लोक काय म्हणतील याचा विचार करत असतो. 


एखादी छोटी गोष्ट करताना सुद्धा लोक काय म्हणतील याचा विचार आपल्या मनात येतो...

- रस्त्यावर चालत जाताना आइस्क्रीमचा गाडा दिसतो आणि आपल्याला आइस्क्रीम खायची असते तर अशी रस्त्यावर चालत चालत आइस्क्रीम....? 

मग मनात विचार  येतो...

लोक काय म्हणतील.....?

- एखादा ड्रेस आपल्याला खूप आवडतो पण वाटतं योग्य दिसेल का ? आपण घालावा का ?

लोक काय म्हणतील..?

- एखादी आवडणारी गोष्ट मग ती कोणतीही असूद्या ती बिनधास्तपणे करता येत नाही....

का तर...

लोक काय म्हणतील?


आपले छंद जोपासताना पण हाच विचार आपल्या मनात चालू असतो. घर बांधताना, घरी कार्यक्रम करताना सुद्धा लोक काय म्हणतील याचा विचार आपण करत असतो. अगदी साधी गोष्ट असली तरी आपण ती करताना लोक काय म्हणतील याचाच विचार करीत असतो. खरच याची गरज असते का? तर अजिबात नाही...


लोक काय म्हणतील?

याचा आपण इतका विचार करतो की आपलं जगणं सीमित होऊन गेलंय...

किती जणांना त्यांच्या मनाप्रमाणे जगात आलं नाहीं आणि येतही नाही...

 

त्याला ही काही कारण आहेत 

आपल्या समाजात अशी काही माणसं आहेत की....


आम्हाला करता येत नाही तर इतर कुणालाही करता येऊ नये, ह्या वैचारिक पातळीची माणसे स्वतःही मनाप्रमाणे जगत नाहीत, इतर कुणालाही जगू देत नाहीत. अशा मनोवृत्तीला आपण इग्नोर करायचं असतं....


आपण स्वतःसाठी जगतो. आपल्या आयुष्याला आपण जबाबदार असतो. तर लोक काय म्हणतील, याची पर्वा किती आणि का बाळगायची? 

याचा अर्थ असाही नाही की मुद्दाम लोकभावना लाथाडाव्यात वा लोकांना दुखावावे... 

पण, जी गोष्ट आपल्याला पूर्णपणे पटली आहे, जी अवैध, अनैतिक, कोणाचं नुकसान करणारी नाही, ती लोकलज्जेपायी न करणे अथवा एखादी गोष्ट अवैध, अनैतिक, वाईट असतानाही लोकानुनय म्हणून करत राहाणे, याला पण काय लॉजिक आहे का ? 


लोक काय म्हणतील...

खरंच लोक काय म्हणतील हा प्रश्न जर बाजूला टाकला तर किती स्वतंत्रपणे, मनमोकळे आयुष्य आपल्याला जगता येईल...


लोकांकडे लक्ष न देता आपण आपल्याला आवडेल ते काम करत राहायचं....

जो तो आपल्या गरजेप्रमाणे पाहत असतो


ज्याची जशी गरज तसा त्यांचा दृष्टीकोन.

त्यामुळे आपलं मन जर आनंदी आणि प्रचंड उर्जेने भरलेलं असेल तर लोकांना काहीही म्हणू द्या....

Ignore it...

भाड मे जाये दुनिया...


जे आपल्याला आवडत ते करायचं .....


बिनधास्त जगायचं ....


आपल्या आयुष्यातला आनंद अनुभवायचा........


कोण काय म्हणतंय याचा आपण विचार करत बसलो तर जगायचं राहून जाईन.....


लक्षात ठेवा जीवन जगताना आपण ते कसे जगतो हे महत्त्वाचे असते. आनंदाने की दुःखाने .....


           वेळ कोणासाठी थांबत नाही ती कायम सुरू असते. आइस्क्रीम खाताना आपल्या लक्षात येत की ती खाल्ली किंव्हा नाही तरी ती वितळते.....

मग आपण काय करायचं तिला वेस्ट होऊ द्यायचं का टेस्ट करायचं. हा निर्णय सर्वस्वी आपलाच असतो...  

कोण काय म्हणेल हा विचार नकोच. आयुष्य आपलं मग कोणाचा कशाला विचार करायचा. मजेत जीवन जगता आलं पाहिजे. 



लोक काय म्हणतील?

याकडे जर आपण लक्षचं दिल नाही, तर आपलं जगणं आनंदाचं होतंच. आणि मग आपल्या जगण्याची खरी मज्जा येते.. 

आणि जे काही आपल्या आयुष्यात होणार आहे त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. त्यातून आपण उत्स्फूर्त होतो, उत्कट होतो आणि स्वतःशी प्रामाणिक, खरेही होतो...


- कोण काय करतय, कोणाचं काय चाललंय याकडे लक्ष दिलं नाही की निवांत जीवन चालत. 

जीवन जगताना कोणाशीही स्पर्धा नको. कोणत्याच बाबतीत नको. 

- कोणाकडे पाहून कसलाही मत्सर नको. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. त्याच्याशी आपली स्पर्धा नकोच. ती करूही नये. 

- सगळ्यात महत्त्वाचे कोणालाही कोणाचंही काही पडलं नाही. आणि नसत पण. फक्त आपण तसा विचार करत नाही. याला काय वाटेल त्याला काय वाटेल हाच विचार करत असतो. 

- एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चांगले करा किंव्हा वाईट लोक तुम्हांला नाव ठेवणारचं. त्या गोष्टीप्रमाणे लोक घोड्यावर बसूनही देत नाहीत आणि त्याला घेऊन चालू ही देत नाहीत. 


            लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. जे काही आपल्याला आवडत ते करायचं. बिनधास्त करायचं. आपल्याला कशात आनंद मिळतो ते शोधल पाहिजे आणि ते केलं पाहिजे. मग त्यावेळी कोण काय म्हणतय हा विचार नको. 


शेवटी 

 'हे जे आहे ते असण्यातं, जे जे करावसं वाटण ते करण्यात' जीवन सामावलेलं आहे...

जे चिरंतन असं सृष्टीचं रहस्य आहे...


Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...