गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

Learn to say No / नाही म्हणायला शिका .....

 

          दैनंदिन जीवन जगत असताना आपण योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नाहीं तर इतर आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देतात. त्या जबाबदर्याच्या ओझ्याखाली आपण घुसमटून जातो. अपेक्षांचे ओझे वाढत जाते. आणि त्यात आपण पूर्ण पणे घेरलो जातो. 

         योग्यवेळी आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपण विचार करतो की त्याला वाईट वाटेल , आपल नात संपेल , आपली मैत्री संपेल. मित्र दुखावेल , नाही कसं म्हणायचं. नाही म्हटलं तर काय होईल...असे खूप विचार मनात येतात आणि त्यामुळे आपण नाही म्हणत नाही. पण या मुळेचं आपण अडचणीत येत असतो. स्वतःला संकटात टाकत असतो. त्या वेळी वाटत का नाही म्हणायला पाहिजे होत. 

        खरच जेव्हा अशी वेळ येते तेव्हा बिनधास्त नाही म्हणायला शिका. जे काही होईल ते होईल जास्त विचार करत बसू नका. स्पष्ट बोलण्याने समोरचा काही वेळ दुखावेल पण त्यालाही आपलं म्हणणं पटेल. पण आपण नाही म्हणायला उशीर केला तर नातं कायमच संपेल. 


          आपण कायम कोणतंही काम असो, की एखादा निर्णय असो , तर आपल्याला सगळे जण गृहीत धरतात. आपल्या विचाराला काहीही किंमत राहत नाही. एक वेळ चांगल्या कामासाठी आपल्याला गृहीत धरलं तर ठीक असतं पण इतर कामासाठी ते चुकीचे असतं. हे होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. सजग राहायला हवं. 

         आणखी एक की विनाकारण आपण त्रास सहन करायचा. आधी आधी आपली माणसे आपल्याला गृहीत धरतात नंतर इतर ही तसंच करतात. हे अधिक त्रासदायक होऊ नये या साठी योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. 

        एखाद्या बाबतीतही नाही म्हणायचं हे ही एक कौशल्य आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. सगळी काम आपण नसतात करायची तर काही कामे इतरांकडून करवून घ्यायची असतात. सगळं आपणच करत बसलो तर त्याचा उपयोग होणार नाही आणि आपला वेळही वाया जाणार.  

       स्पष्ट बोला पण असे स्पष्ट बोला कीं त्यामुळे इतरांना कष्ट होणार नाही आणि आपले नाते नष्ट होणार नाही. लक्षात ठेवा नाही हा शब्द ही खूप महत्त्वाचा आहे पण तो कधी आणि कसा वापरायचा हे माहिती हवं.




मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

मला आवडणारे पौराणिक पात्र.....

           पौराणिक कथांच मला लहानपणापासून एक अनामिक आकर्षण राहिलं आहे. मी लहान असताना टी व्ही वरती रामायण , महाभारत , श्रीकृष्णा , जय हनुमान या मालिका असत. या सगळ्या मालिकांमधील सगळ्या मी न चूकता पाहिल्या आहेत. पौराणिक कथा आणि त्यातील पात्र यांमधून खूप काही शिकायला मिळत. रामायण पाहताना राम किती साधा, सरळ, एकवचनी , एकपत्नी, वडिलांनी दिलेल्या वचनासाठी स्वतः राज्य त्याग करून वनवासात निघून जाणारा राम पहिला की भारी वाटत पण मला आवडतो तो कृष्ण.....

          सतत हसतमुख राहणारा कृष्ण. सगळंच जणू काही माहीत आहे असं वागणं. प्रत्येक संकटाच्या वेळी हतबल न होता त्यातून नक्की बाहेर कस पडायचं हे जाणून असणारा कृष्ण वेगळाच भासतो. बुद्धी आणि चातुर्याने सगळ्या संकटांचा सामना करता येतो हे कृष्णाकडे पाहिलं की कळतं. 

त्याच रूप मनावर गारुड करत. मोरपीस आणि हसरा चेहरा मनात घर करून राहत.

           मैत्री म्हणजे काय ते कळत. मित्रांमध्ये गरीब-श्रीमंत , राजा-सेवक, उच्च- नीच , सुंदर-कुरुप असं काहीच नसत असते ते मित्रप्रेम. मैत्रीत पद-प्रतिष्ठा असत नाही असते ती निखळ मैत्री. खरच तो हे नातं कसं असावं हे सांगतो.  

           कृष्णाचा जन्म कोठडीत झाला. त्याला मारण्याचे किती तरी प्रयत्न झाले पण त्यातून तो बाहेर पडला. स्वतःवर अन्याय झाला म्हणून त्याने दुसऱ्यावर कधी अन्याय केला नाही आणि होऊ ही दिला नाही. परिस्थिती कशी का असेना पण आपण सगळ्यांशी चांगलेच वागले पाहिजे. नियती योग्य वेळी न्याय करते. विनाकारण इतरांना  दोष देऊ नये. 

            महाभारतात तो तटस्थ राहू शकला असता पण तो योग्य बाजूने उभा राहिला. कौरवांन कडे किती महान योद्धे , अफाट सेना होती पण तो न्यायाच्या बाजूने उभा राहिला. ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत नाहीत त्या विषयी जास्त विचार न करता त्या मान्य कराव्यात. हे तो सांगतो.

 कृष्णाकडे पाहिलं की जीवनाकडे वेगळ्याच दृष्टीने पाहता येतं. आपण एखाद्या गोष्टी कडे कसे पाहतो त्यानुसार ती गोष्ट ठरत असते. महाभारतात रणांगणावर अर्जुनाला का ? कसं ? कोणासाठी ? लढल पाहीजे हे सांगतो. पण खरं तर तो सगळ्यांनाचं सांगत असतो की आपल्या आयुष्यात आपण कसं जगावं. जीवन जगताना आपण सगळेच अर्जुन असतो. या युद्धात आपल्याला जिंकायचं असेल तर कृष्णासारखा एक सारथी असायला हवा. 

कृष्ण सांगतो की एखाद्याचा निरोप घ्यायचा असेल तर झटकन निरोप घ्यावा..  निरोप घेताना रेंगाळू नये , जितका जास्त वेळ निरोप घ्यायला लावाल तितका जास्त त्रास होतो... 

         लहानपणी कृष्णाच्या कथा व त्यातील चमत्कार खूप भावतात आणि जस जसे आपण मोठे होऊ लागतो त्या प्रत्येक टप्यावर तो अधिकाधिक समजत जातो. 

आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तो नव्याने समजतो. जीवनात येणारे अनुभव आणि त्यानुसार कळतं जाणारा कृष्ण हे एक गूढ आहे. तो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करतो. 

          खरच समृद्ध जीवन जगायचं असेल तर कृष्ण अभ्यासावा. तो आपलं जीवन व्यापून टाकतो. ते अधिकाधिक समृद्ध करण्यास मदत करतो. 

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

Gym's craze for youth./ तरुणाईला लागलेले जीम चे वेड.....

           आजकाल आपण पाहतो की प्रत्येक तरुणाला सिक्स पॅक बॉडी हवी असते. आपलं शरीर आकर्षक असावं असं वाटत. बायसेप, ट्रायसेप, शोल्डर यांच वेड लागलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे तंदुरुस्त शरीर असं त्यांना वाटत पण खरंच जीम म्हणजे तंदुरुस्त शरीर आहे का ? जिम ने शरीर आकर्षक बनत तंदुरुस्त नाही.

           व्यायाम शरीरासाठी खूप आवश्यक आहे. पण तो शरीर निरोगी राहण्यासाठी मदत करणारा असावा. आज काल प्रत्येकाला आकर्षक शरीर हवंय. ते ही खूप लवकर. त्यासाठी जीम चा आधार घेतला जातो. लवकरात लवकर फिट दिसण्यासाठी स्टिरॉइड्स घेतले जातात. जे आपल्या शरीराला आतून कमजोर करतात. नैसर्गिक प्रतिकार शक्ती काढून घेतात. त्या प्रोटीन पावडर स्टिरॉइड्स मुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. आपण सुंदर तर दिसतो पण आतून कमजोर झालेलो असतो. जेव्हा आपण पाहतो की एखादा फिट बॉडी असणारा ऍक्टर हार्ट अटॅकने गेला तेव्हा आपल्याला धक्का बसतो. पण त्याच मूळ कारण म्हणजे आकर्षक दिसण्यासाठी केलेला व्यायामाचा अतिरेक .


             ​शरीर मजबूत बनवायचं आहे का फक्त आकर्षक बनवायचं आहे हे तरुणांनी लक्षात घ्याव. शरीर सजवयाच आहे का ते आतून मजबूत ठेवायचं आहे याचा विचार करावा. मोडकळीस आलेल्या घराला रंग आणि इतर सजावट करून ते बळकट होत नाही ते आतून मजबूत करण्यासाठी त्याचा पाया , ढाच्या वर काम करायला हवं. तसंच आपल्या शरीरचं आहे. त्याला पण सजवयाच्या नादात न पडता ते मजबूत कसं बनेल यावर लक्ष दिलं पाहिजे. जीम मध्येच शरीर आकर्षक होत असे नाही तर योगा, मेडिटेशन यांमुळे सुद्धा शरीर आतून बाहेरून मजबूत होते..

          कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जीम मध्ये काहीजण आकर्षक दिसण्यासाठी प्रमाणापेक्षा खूप व्यायाम करतात. व्यायामाचा अतिरेक केला जातो त्यामुळे हृदयावर त्याचा दुष्परिणाम होतो. जीममुळे व्यायामाची योग्य वेळ पाळली जात नाही. कधीही आणि कितीही व्यायाम केला जातो. त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. 

          व्यायाम म्हणजे शरीराला आतून मजबूत बनवण असत. त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणं असत. हे ज्या दिवशी तरुणाई ला समजेल त्यावेळी त्यांना जीम आणि व्यायाम यातील फरक समजेल.

 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

संप आणि नागरिक.......

          लोकशाही व्यवस्थेत मध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी विविध मार्ग आहेत. संवाद साधून आपण सरकारशी आपली बाजू मांडू शकतो. उपोषण करून एखाद्या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकतो. काही कर्मचारी आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार कडे मांडतात आणि त्यातुन मार्ग काढतात ...

          पण कधी कधी संप पुकारला जातो. काम बंद आंदोलन केले जाते. सार्वजनिक सुविधा पुरवणारे कर्मचारी ज्या वेळी असा संप करतात त्या वेळी त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो सर्वसामान्य नागरिकाला. कधी बँक कर्मचारी संप पुकारतात तर कधी एस स्टी कर्मचारी संप करतात. कधी रिक्षावाले संप करतात तर कधी बेस्ट कर्मचारी. सरकार आणि या संपकऱ्यांमध्ये लवकर वाटाघाटी होत नाहीत आणि त्याच्यात त्रासाला जातो तो सर्वसामान्य नागरिक. तो सगळ्यांमध्ये भरडला जातो. त्त्याची काहीही चूक असतं नाही पण त्रास त्यालाच होतो. 

           नागरिकांना सगळ्या सुविधा पुरवणे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचे काम असतं. सार्वजनिक सुविधा या नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी असतात. त्यांना योग्य वेळी त्यांचा उपयोग करता यायला हवा यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. पण ज्या वेळी संप पुकारला जातो त्यावेळी या व्यवस्था विस्कळीत होतात किव्हा कधी कधी पूर्णपणे बंद होतात. अशा वेळी नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांशी तोंड द्यावे लागते. 

         तो सार्वजनिक सुविधा वापरतो, तो त्यावर विसंबून असतो,  सरकारच्या कारभारावर त्याचा विश्वास असतो नक्की काय चूक असते त्याची...  त्यामुळे त्याला शिक्षा मिळते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याची काहीही चूक असत नाही. 

         संपकरी त्याच्या हक्कासाठी भांडतात. त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे या बद्दल दुमत नाही. पण संपकरी आणि सरकार यांच्या मध्ये भरडला जाती तो सामान्य नागरिक. त्याची नक्की काय चूक असते बरं....

       खरंच  सर्वांनी विचार करण्याची गरज आहे......

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

Live in a relationship / लिव्ह एन रिलेशनशिप

 भारतीय समाजामध्ये आता काही नवीन संकल्पना रुजायला लागल्या आहेत. बदलत्या जगासोबत चालायचं, जुनं आता काही राहील नाही , परंपरागत गोष्टीतून बाहेर पडायला हवं , स्वातंत्र्य हवं याच्या नावाखाली तरुण पिढी लिव्ह एन रिलेशनशिप ला प्रोत्साहन देऊ लागली आहे. 

              नक्की ही संकल्पना आहे काय ? तर लग्नाआधीचं तरुण तरुणी एकत्र राहायचं त्याचं एकमेकांशी पटलं तर लग्न करायचं नाही तर एकमेकांना मोकळं करायचं. कसलीही बंधनं नाहीत. जबाबदाऱ्या नाहीत.

               लग्न करून जर एकमेकांशी पटलं नाही. त्यानंतर वाद सुरू झाले, घटस्फोट घ्यावा लागणार त्यापेक्षा आधीच लिव्ह एन रिलेशनशिप  मध्ये राहायचं. म्हणजे पुढचे त्रासच नकोत. कुटुंबातील व्यक्तींना पण त्रास नको. अशी कारणे देऊन लिव्ह एन रिलेशनशिप च समर्थन केलं जातं. 

               पण हे सामाजिक दृष्टीने बरोबर आहे का ? भारतीय समाज त्याला मान्यता देईल का ? ज्या देशात लग्न हा खूप महत्त्वाचा सोहळा मानाला जातो. दोन कुटुंब एकमेकांसोबत जोडली जातात. लग्न म्हणजे सात जन्मीचे बंधन मानले जाते. ते पवित्र बंधन टिकवण्यासाठी सर्वजण खूप प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेसारखा सण आणि करवाचौथ हे सण जे पती आणि पत्नी मधील नात घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. अशा देशात लग्न न करता एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी एकत्र राहणे ही संकल्पनाच विचित्र आहे. 

              भारतासारख्या देशात जिथे वैवाहिक नातेसंबधांना पवित्र मानले जाते तिथे अशा संबंधांना मान्यता आहे का याचा ही विचार करावा लागेल. विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्ती मधील नातं नसतं तर ते दोन कुटुंबातील नात असतं. 

              लिव्ह एन रिलेशनशिप ही संकल्पना अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देते. त्यामध्ये जबाबदारीची जाणीव योग्य प्रमाणात होत नाही. नाही जमलं तर दुसरे पर्याय असतात आणि पर्याय असले की एक नात्यात विश्वास असत नाही. आज याच्या बरोबर उद्या त्याच्या बरोबर असं कोणतंही नात दीर्घ काळ टिकत नाही. लिव्ह एन रिलेशनशिप बहुतांश लोकांना मान्य नाही. त्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम कसे सोडवायचे याचीही योग्य माहिती नाही. 

             भारतासारख्या  देशात लिव्ह एन रिलेशनशिप योग्य ठरणार नाही. कारण आपल्या देशाला महान संस्कृतीचा वारसा लाभला आहे. समाजमन या  संकल्पनेला मानू शकत नाही. लग्नाचं नात पवित्र मानलं जातं आणि  लिव्ह एन रिलेशनशिप तर त्यातून सगळं पावित्र्यच नष्ट करत. 

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

लहान कुटुंबामुळे मुलं एकटी पडत आहेत का ?

            कुटुंबव्यवस्था ही माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. कुटुंबामुळे आपल्या सामाजिक , आर्थिक , भावनिक गरजा पूर्ण होत असतात. लहान मुलांना कुटुंबामुळे सुरक्षितता लाभते. 

           आजच्या काळात एकत्रितकुटुंब विभक्त होत आहेत. नोकरी, वाद , आर्थिक या कारणानं कुटुंबातील लोक बाहेर राहू लागली आहेत. जो तो आपल्याच विश्वात गुंग आहे. आपलं काम आणि आपण मग कोण काय करतय याच कुणाला काही पडलं नाही. 

           एकत्रित कुटुंबामुळे सर्वांची भावनिक गरज पूर्ण होत होती. आजी, आजोबा, काका, काकी या सर्वांचा वावर कुटुंबात होत असायचा. कोणाला काही मदत लागली तर ती केली जात होती. लहान मुलांच्या मनात एकमेकां बद्दल प्रेम वाढत होते. आजी , आजोबांचा सहवास त्यांना लाभत होता त्यातून मुलं हळू हळू घडत होती. जबाबदारीची जाणीव त्यांना कुटुंबातच होत होती. इतरांशी कस वागायचं कसं बोलायचं याचं भान त्यांना होत. त्यासाठी काही विशेष शिकवण्याची गरज नव्हती. 

           मुलाचं भावनिक विश्व यामुळे समृद्ध होत होत. आजीच्या गोष्टी आणि आजोबा याच्या अनुभवातील प्रसंग यांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम होत होता. एकत्रित कुटुंबात सतत कोणी ना कोणी घरी असत होत त्या मुळे एकटेपणाची भावना म्हणजे काय ते मुलांना माहीत न्हवते. आपल्याबरोबर दुसऱ्यांचा विचार करायला मुलं आपोआप शिकत होती. जे काही असेल ते इतरांना देत होती.

            पण जस जशी कुटुंब लहान होत गेली तसं तसं मुलांचं भावविश्व कोमेजून जायला लागलं. घरात माणसं कमी झाली. आई वडील कामात गुंतले त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना. आजी आजोबा नसल्याने गाणी गोष्टी सांगायला कोणी उरलं नाही. मुलांशी संवाद कमी झाला. कुटुंबच छोट झालं त्यामुळे इतरांचा सहवास कमी झाला. भावनिक गरजा पूर्ण होण्यात अडचणी येऊ लागल्या. भाऊ बहीणी ज्या मोठया कुटुंबात त्यांच्याशी खेळण्यासाठी सहज उपलब्ध होत होती ती आता राहिली नाहीत. मुलं एकटी पडू लागली. 

          मुलांचा मोबाईलचा वापर वाढू लागला. आई वडील कामात असल्याने त्यांना मुलांसाठी वेळ देता येत नसल्याने त्यांनी त्यांना मोबाईल दिला आणि मुलं त्यामध्ये अडकून पडली. ती अधिकाधिक एकटी पडू लागली. 

          लहान कुटुंबात मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत. एकटेपणात वाढ होत आहे. मुलं एकलकोंडी होऊ लागली आहेत. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. मोबाईल, टीव्ही, गेम च्या आर्टिफिशिल जगातून त्यांना बाहेर काढून वास्तविक जगात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेच आहे. 


सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

The giver should keep on giving / देणाऱ्याने देत जावे

                     देणाऱ्याने देत जावे,

                     घेणाऱ्याने घेत जावे. 

                     घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. "

              दिल्याने वाढत. हो खरच माणसाने नेहमी देण्याचा प्रयत्न करावा. ज्या परिस्थितीत तुम्ही असता त्या परिस्थितीत देण्यास सुरुवात करा. जेवढी तुमची ऐपत असेल तेवढ द्या. 

             माझ्याकडे काही नाही मी काय कुणाला देणार. जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी देईल. अस आपण म्हणत असतो पण खरं तर तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि पहा तुमच्या कडे वेगाने अनेक गोष्टी यायला सुरुवात होतील. झाड आपली सावली, फळ , फुलं सगळयांना देत असते. ते कोणाशीही कसलाही भेदभाव करत नाही. तसचं निस्वार्थपणे आपण द्यायला ह

            रवींद्रनाथ टागोर म्हणतात की  " माणसाने आपली भरलेली ओंजळ कायम रिकामी करत जावी म्हणजे ती पुन्हा नव्या नव्या गोष्टीने भरत जाते." तुमच्या कडे जे काही असेल ते द्या. ज्ञान असेल तर ते वाटा. प्रेम द्या. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी प्रयत्न करा. कोणी आपल्याला काय दिलंय ते पाहू नका. आपण निस्वार्थ पणे द्यायला सुरुवात करा. कोणी तरी मला दिल तरच मी पण देणार. असा विचार म्हणजे तो व्यवहार असतो. आपल्याला व्यवहार करायचा नाही. निस्वार्थ पणे द्यायचं आहे. कशाचीही अपेक्षा न करता. 

           लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्ही द्याल त्याच गोष्टी दुप्पट होऊन पुन्हा तुमच्या कडे परत येतील. त्यामुळे चांगलं असेल ते द्या. तुम्ही इतरांशी जस वागाल तसंच लोक तुमच्याशी वागतील. देत चला आणि त्यातील आनंद अनुभवा. तो आनंद काय असतो ते दिल्यानंतरचं कळत. 

          प्रेम, धन, अन्न, तिरस्कार, ज्ञान,आनंद जे असेल ते द्या. पण लक्षात ठेवा जे तुम्ही देताल ते पुन्हा चक्रवाढ होऊन तुमच्या कडे परत येत. आता तुम्ही ठरवा काय द्यायचं ते निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. 


Shaarad Sir

उर्मिला

  उर्मिला... रामायण माहीत असत, पण उर्मिला नक्की कोण हेच काही जणांना माहीत नसतं... जेव्हा कळतं तेव्हा काय तर लक्ष्मणाची पत्नी एवढंच... एखादी ...