पौराणिक कथांच मला लहानपणापासून एक अनामिक आकर्षण राहिलं आहे. मी लहान असताना टी व्ही वरती रामायण , महाभारत , श्रीकृष्णा , जय हनुमान या मालिका असत. या सगळ्या मालिकांमधील सगळ्या मी न चूकता पाहिल्या आहेत. पौराणिक कथा आणि त्यातील पात्र यांमधून खूप काही शिकायला मिळत. रामायण पाहताना राम किती साधा, सरळ, एकवचनी , एकपत्नी, वडिलांनी दिलेल्या वचनासाठी स्वतः राज्य त्याग करून वनवासात निघून जाणारा राम पहिला की भारी वाटत पण मला आवडतो तो कृष्ण.....
सतत हसतमुख राहणारा कृष्ण. सगळंच जणू काही माहीत आहे असं वागणं. प्रत्येक संकटाच्या वेळी हतबल न होता त्यातून नक्की बाहेर कस पडायचं हे जाणून असणारा कृष्ण वेगळाच भासतो. बुद्धी आणि चातुर्याने सगळ्या संकटांचा सामना करता येतो हे कृष्णाकडे पाहिलं की कळतं.
त्याच रूप मनावर गारुड करत. मोरपीस आणि हसरा चेहरा मनात घर करून राहत.
मैत्री म्हणजे काय ते कळत. मित्रांमध्ये गरीब-श्रीमंत , राजा-सेवक, उच्च- नीच , सुंदर-कुरुप असं काहीच नसत असते ते मित्रप्रेम. मैत्रीत पद-प्रतिष्ठा असत नाही असते ती निखळ मैत्री. खरच तो हे नातं कसं असावं हे सांगतो.
कृष्णाचा जन्म कोठडीत झाला. त्याला मारण्याचे किती तरी प्रयत्न झाले पण त्यातून तो बाहेर पडला. स्वतःवर अन्याय झाला म्हणून त्याने दुसऱ्यावर कधी अन्याय केला नाही आणि होऊ ही दिला नाही. परिस्थिती कशी का असेना पण आपण सगळ्यांशी चांगलेच वागले पाहिजे. नियती योग्य वेळी न्याय करते. विनाकारण इतरांना दोष देऊ नये.
महाभारतात तो तटस्थ राहू शकला असता पण तो योग्य बाजूने उभा राहिला. कौरवांन कडे किती महान योद्धे , अफाट सेना होती पण तो न्यायाच्या बाजूने उभा राहिला. ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत नाहीत त्या विषयी जास्त विचार न करता त्या मान्य कराव्यात. हे तो सांगतो.
कृष्णाकडे पाहिलं की जीवनाकडे वेगळ्याच दृष्टीने पाहता येतं. आपण एखाद्या गोष्टी कडे कसे पाहतो त्यानुसार ती गोष्ट ठरत असते. महाभारतात रणांगणावर अर्जुनाला का ? कसं ? कोणासाठी ? लढल पाहीजे हे सांगतो. पण खरं तर तो सगळ्यांनाचं सांगत असतो की आपल्या आयुष्यात आपण कसं जगावं. जीवन जगताना आपण सगळेच अर्जुन असतो. या युद्धात आपल्याला जिंकायचं असेल तर कृष्णासारखा एक सारथी असायला हवा.
कृष्ण सांगतो की एखाद्याचा निरोप घ्यायचा असेल तर झटकन निरोप घ्यावा.. निरोप घेताना रेंगाळू नये , जितका जास्त वेळ निरोप घ्यायला लावाल तितका जास्त त्रास होतो...
लहानपणी कृष्णाच्या कथा व त्यातील चमत्कार खूप भावतात आणि जस जसे आपण मोठे होऊ लागतो त्या प्रत्येक टप्यावर तो अधिकाधिक समजत जातो.
आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तो नव्याने समजतो. जीवनात येणारे अनुभव आणि त्यानुसार कळतं जाणारा कृष्ण हे एक गूढ आहे. तो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करतो.
खरच समृद्ध जीवन जगायचं असेल तर कृष्ण अभ्यासावा. तो आपलं जीवन व्यापून टाकतो. ते अधिकाधिक समृद्ध करण्यास मदत करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा